प्रा. किरण जगताप
कर्जत / जलभूमी वृत्तसेवा
---------------------------
भटकंती करणारा समाज हा आजही प्राथमिक गरजांसाठी जीवाचा आकांत करून होरपळत, टाहो फोडत आहे. महाराष्ट्रातील व देशाच्या लोकसंख्येत १५ टक्के आकडेवारीत मोडणारा हा गट आहे. कधी पालात, कधी झाडाखाली, कधी पुलाखाली आणि कच्च्या वस्त्यांमध्ये राहणारा, नेहमी दिसणारा आणि तरीही नजरे-आड जाणारा हा समुदाय आज दाहक चटके सोसत जीवन जगत आहे. कोरोना परिस्थितीमुळे तर या समाजाची मोठी फरफट सुरु आहे. कर्जत तालुक्यातही हे भयावह चित्र दिसत आहे.
शतकानुशतके हा समाज आपल्या मुलभूत प्रश्नांसाठी झगडत आहेत. गोसावी, भराडी, गारुडी, लोहार, नंदीवाले, वैदू, बहुरुपी, धनगर, बेरड, वडार आदी भटक्या जमातीतील लोक संघर्षमय जीवन जगत आहेत. एका गावावरून दुसऱ्या गावाकडे भटकणाऱ्या या कुटुंबांची मोठी फरपट सुरू आहे. घरामध्ये अन्न धान्याचा साठा नाही, मोठ्या परिश्रमातून मिळवलेले मोजके पैसे, किरकोळ साधने आणि अपुऱ्या माहितीच्या सहाय्याने हा वर्ग कोरोनाबरोबर संघर्ष करत आहे. काही प्रमाणामध्ये सामाजिक संस्था-संघटना, शासन या समूहापर्यंत पोहोचतही आहे. मात्र ते मर्यादित स्वरूपात आहे.
अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, सामाजिक सुरक्षा अशा मूलभूत गोष्टींपासून हा समाज वंचित आहे. कोरोना संकटाचे मोठे ओझे या समुदायातील लोकांच्या डोक्यावर येऊन पडले आहे. घर चालवण्यासाठी अन्न धान्याचा शोध घेण्यात महिला, मुलांनाही बाहेर पडावे लागत आहे. या समुदायातील मुली व महिलांच्या समस्या या गंभीर आहेत. महिलांमध्ये अनारोग्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते.
अशक्तपणा, प्रजनन तसेच मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. नित्याच्या भटकंतीमुळे या समूहातून अत्यल्प संख्येने मुली प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण घेताना दिसतात. उच्च शिक्षण त्यांच्यासाठी दुरापास्त झाल्याचे दिसते. लॉकडाऊन संपल्यावर इतरांसाठी नेहमीप्रमाणे आयुष्य सुरु होईल. पण या समुदायाची चिंता ही इथेच संपत नाही.
पावसाने जर यावेळीही रौद्र रूप धारण केले तर या समुदायासाठी ती अजून भीषण परिस्थिती ठरेल. या समुदायाच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होतील. कोरोनानंतर कोणतेही नवीन संकट आले, तर ते पेलण्याची ताकद आता भटक्या समाजात राहिलेली नाही. कोणत्याही संकट काळात किंवा परिस्थितीत अज्ञान, भोळेपणा आणि माहितीच्या अभावातून हा समुदाय मोठ्या प्रमाणावर फसवणुकीला सामोरे जातो. त्यामुळे सामाजिक, राजकीय स्तरावर भटक्या समूहांसाठी विचारमंथन होणे गरजेचे आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...