लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियातील चमकोगिरी - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, २२ मे, २०२१

लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियातील चमकोगिरी

लोकप्रतिनिधी फोटो काढण्यापुरते सामाजिक उपक्रम राबवतात - चर्चा
 

अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा  

-----------------------------------

 

राजकारणात यशस्वी होण्यासाठी विविध क्लुप्त्या आणि तंत्रांचा वापर केला जातो. राजकारणात प्रतिमा निर्माण करण्याचा तो एक महत्त्वाचा भाग असतो. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी हे आपली प्रतिमा बनवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करतात. अनेक लोकप्रतिनिधी हे आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांची सुखदुःख समजून घेतात. अडचणीच्या काळात त्यांना मदत करतात, खंबीरपणे मागे उभे राहून साथ देतात. त्यामुळे बच्चू कडू यांच्यासारखे लोकप्रतिनिधी हे जनतेच्या गळ्यातील ताईत होतात. आमदार निलेश लंके यांचे सध्याचे काम असेच आहे.

 

 

सध्या काही लोकप्रतिनिधी केवळ सोशल मीडियातून चमकोगिरी करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र दिसते. सोशल मीडियातील पेड यंत्रणेवर बेमाप खर्च करून आभासी चित्र निर्माण करून प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. फोटो काढण्यापुरते सामाजिक उपक्रम घेवून त्याची पेड यंत्रणेद्वारे प्रसिद्धी घेतली जाते. उपक्रमाच्या अगोदर प्रसिद्धीसाठी पोस्टरबाजी, पत्रकांचे वाटप, पेड यंत्रणेकडून मेसेजिंग, फोन कॉल, सोशल मीडिया कॅम्पेनिंग करून प्रसिद्धी होते. कार्यक्रमा दरम्यान कार्यक्रम विषयापेक्षा फोटो आणि चित्रफिती काढणाऱ्यांची लगबग अधिक दिसते. उपक्रमात समाजाभिमुखतेपेक्षा कॅमेरा सेटिंग महत्वाचे झाल्याचे दिसते. त्यामुळे असे लोकप्रतिनिधी हे आपल्या कर्तव्यापेक्षा आभासी जग निर्माण करून त्या विश्वात राहणे पसंत करतात काय ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

सोशल मीडियातून निर्माण केलेले चित्र वास्तवात अनुभवयास मिळाले नाही तर जनतेचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहत नाही. जनतेने दिलेला जनाधार हा दिखाऊपणा करण्यासाठी नाही, तर गाजावाजा न करता लोकहिताची कामे करून त्यांच्या दुःखाचे शमन करण्यासाठी दिलेला असतो. मात्र या विचारांशी फारकत झाली तर ते जनतेचे दुर्दैव ठरते. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी काय करतो याकडे सामान्य जनता, गोरगरीब, उपेक्षित, वंचित असलेल्या समाज घटकांचे लक्ष असते. लोकप्रतिनिधीने केलेले चांगले अथवा चुकीचे काम हे जनतेच्या नजरेतून कधीच चुकत नसते. त्यामुळे स्वप्रसिध्दीपेक्षा लोकप्रतिनिधीने केलेल्या कामांची जनतेतून झालेली चर्चा ही कायम जनाधार टिकून ठेवत असते.

 

लोकप्रतिनिधींसाठी निसरड्या जागा अनेक असतात. एखादी मोठी चूक भूतकाळात केलेले कर्तृत्व संपवून टाकण्यासाठी पुरेशी असते. लोकप्रतिनिधींच्या मागे कार्यकर्त्यांचा गराडा असणे साहजिकच असते. त्यातील स्वार्थाने जवळ आलेले व खोटे स्तुतीपाठक ओळखण्याचे कौशल्य पणाला लावावे लागते. एकदा चांडाळचौकडीने आपले पाय रोवले तर लोकप्रतिनिधी सामान्य जनतेपासून दुरावत जातो. स्वार्थासाठी चुकीची माहिती देवून दिशाभूल केली जाते. त्यामुळे निस्वार्थी भावनेने नेत्याचे कार्य पुढे नेणारे कार्यकर्ते जपणे हे महत्वाचे असते. आपल्यासाठी त्याग करणाऱ्यांना कमी लेखून दुर्लक्ष केले तर काळ कधीच माफ करीत नाही हे लक्षात ठेवावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...