मुख्याधिकारी जाधव यांनी दिला मदतीचा हात, अंत्यसंस्कार पडले पार
दिलीप अनारसे
कर्जत / जलभूमी वृत्तसेवा
कोरोनाने जवळचा कोण, लांबचा कोण अशी नात्याची परीक्षा घेतली. परदेशी असलेल्या मुलांना आपल्या आई-वडील, नातेवाईकांचे अंत्यदर्शनही घेता येत नाही. मायदेशी परताही येत नाही. त्यांच्या मनाची घालमेल समजू शकते. काहीजण जवळ असूनही दूरचे झाले आहेत. जन्मदात्यांच्या अंत्ययात्रेत खांदेकरी होण्यासही ते धजावत नाहीत. कर्जतमध्ये तसा प्रकार घडला आहे. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनाच खांदा द्यावा लागला.कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पित्याचा मृतदेह सरणावर ठेवण्यास एकुलत्या एक मुलाने नकार दिला.
माणुसकीच्या भावनेतून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी मदतीचा हात देत अंत्यसंस्कार केले. "इथे ओशाळला मृत्यू, थिजली नाती आणि हद्दपार झाली माणुसकी' याचा प्रत्यय कर्जतकरांना आला.तालुक्यातील तिघांचा दि. १५ रोजी कोरोनाने मृत्यू झाला. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी कर्मचाऱ्यांना बरोबर घेत सर्व खबरदारी घेऊन हे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेले. त्यांतील एका मृतदेहाचे वजन जास्त असल्याने, दोन कर्मचाऱ्यांना तो उचलणे अडचणीचे ठरत होते. काही अंतरावर मृताचा मुलगा उभा होता. या कर्मचाऱ्यांनी जन्मदात्या बापाच्या मृतदेहास सरणावर ठेवण्यासाठी मदत करण्याची विनंती त्याला केली. मात्र कुठलाही धोका नसताना मुलाने जन्मदात्या बापाच्या मृतदेहाला हात लावण्यास नकार दिला.
या वेळी तेथेच उभे असलेले मुख्याधिकारी जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला आणि अंत्यसंस्कार पार पडले.रक्तातील नात्याने, तेही एकुलत्या एका मुलाने शेवटच्या क्षणी बापाच्या मृतदेहास उचलण्यास नकार दिला. आम्ही तर गेले अनेक दिवस जातपात, रात्र वा दिवस न पाहता मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहोत. आम्हाला घरदार, प्रपंच, कुटुंबीय आहेत. आम्ही काय करावे, असा उद्विग्न सवाल स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने यावेळी केला.
मन विषण्ण झाले
कोरोना संसर्ग झपाट्याने विळखा घालीत आहे. त्याने अनेकांना कवेत घेतले आहे. काहींना बेफिकिरीने मृत्यूच्या दाढेत लोटले. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या सोळा जणांवर अंत्यसंस्कार केले; मात्र मुलाने वडिलांच्या मृतदेहास हात लावण्यास नकार दिल्याने मन विषण्ण झाले. अजूनही वेळ गेलेली नाही. सावध व्हा, घरीच बसा.
कोरोना संसर्ग झपाट्याने विळखा घालीत आहे. त्याने अनेकांना कवेत घेतले आहे. काहींना बेफिकिरीने मृत्यूच्या दाढेत लोटले. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या सोळा जणांवर अंत्यसंस्कार केले; मात्र मुलाने वडिलांच्या मृतदेहास हात लावण्यास नकार दिल्याने मन विषण्ण झाले. अजूनही वेळ गेलेली नाही. सावध व्हा, घरीच बसा.
- गोविंद जाधव, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कर्जत

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...