वाळू हप्तेखोरी तील गाॅडफादरच्या संपत्तीची चौकशी करा, जनतेची मागणी - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, ५ मे, २०२१

वाळू हप्तेखोरी तील गाॅडफादरच्या संपत्तीची चौकशी करा, जनतेची मागणी

दैनिक जलभूमीच्या वृत्ताचे अनेकांनी केले स्वागत
 

बाळासाहेब जाधव 

शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 

 

शेवगाव तालुक्यातील वाळू हप्तेखोरी प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. दि. ७ एप्रिल रोजी शेवगाव उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील वसंत कान्हु फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी), संदिप वसंत चव्हाण (रा. पोलीस वसाहत, शेवगाव), कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी ) यांनी पाथर्डी येथील एका वाहनधारकांला कारवाई ची धमकी देत पैशांची मागणी केली होती. 

 


 

संबंधित तक्रारदाराने आपणास व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुरावे सादर केलेले असताना गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. या तक्रारीची दैनिक जलभूमी ने दखल घेत महाराष्ट्र दिनी दि.1 च्या अंकात शेवगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, अवैध धंदे बोकाळली, वाळू तस्करीच्या गुन्हेगारीत वाढ, पोलिस तडजोडीच्या बैठकीत मग्न, गुन्ह्याचा तपास शून्य या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन खडबडून जागे होत वरील तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून आरोपी फरार आहेत. 

 

उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकातील तीन पोलीस कर्मचारी हप्ते खोरी करत असताना याचा सुगावा साहेबांना का लागला नाही. अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात तरबेज असलेले अधिकारी, त्यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या हप्तेखोरी चा साधा मागमूस त्यांना लागला नाही, हे विशेष म्हणावे लागेल. पडद्याआड दडलेल्या ( गाँडफादर ) अधिकाऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील काय कारवाई करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्यांना बळीचे बकरे करुन हे प्रकरण दडपण्याचा हा प्रकार तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्या त्रिमूर्तीने कोणाच्या वरदहस्ताने आणि कोणाच्या सांगण्यावरुन हे उद्योग केले. त्या अधिका-यांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. 

 

शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मोठी माया जमा केली असल्याची पोलीस प्रशासनात दबक्या आवाजात चर्चा असल्याने या दोन्ही अधिका-यांच्या नावावर व नातेवाईकांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी.अशी मागणी जनतेमधून जोर धरु लागली आहे. आजही हप्तेखोरी व अवैध धंदे राजरोसपणे चालू असल्याने दोन्ही अधिका-यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात यावा.अन्यथा कोविड - १९ चे सर्व नियम पाळून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल,असा इशारा एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिला आहे.

 


तीनही पोलीस कर्मचारी निलंबित

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेवगाव उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तीनही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरनाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...