उन्हाळी आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ? आवर्तन सोडा,अन्यथा आंदोलन - बामदळे - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, ५ मे, २०२१

उन्हाळी आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ? आवर्तन सोडा,अन्यथा आंदोलन - बामदळे

टेलच्या भागातील पाणी पातळी खालावली, पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर
 

अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा 

 

मुळा धरणाच्या कालव्याचे आवर्तन दि. ५ मे रोजी सुटणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. ५ या तारखेला सदर आवर्तन सोडण्यात आलेले नाही. सध्या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीमुळे सध्या शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्यांंजवळ जगण्यासाठी शेती हे एकमेव उत्पन्नाचे साधन राहिलेले आहे. पिके जगविण्यासाठी या महिन्यात शेतीला पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण करावी लागत आहे. शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास मुळा धरणाचे पाणी उशिरा सुटल्यामुळे हिरावून घेतला जाईल. अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

 

 

 

सध्या ऊस, भुईमूग, मका व जनावरांना लागणारे चाऱ्याची पिके पाण्यावाचून जळायला लागलेली आहे. मागील वर्षी पाणी असून सुद्धा पाणी उशिरा दिले होते. त्या वेळी भातकुडगाव, भायगाव परिसरातील पिके पूर्णपणे जळून खाक झाली होती. त्यावेळी सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी ना. बच्चुभाऊ कडू यांना दूरध्वनीद्वारे माहिती देऊन विनंती केलेली आहे. ना.कडू यांनी संबंधितांना पाणी लवकरात लवकर देण्याची आदेश दिलेले आहेत. धरणात मुबलक पाणी साठा असताना धरण कालवा समिती या बाबीकडे दुर्लक्ष करून पाणी उशिरा सोडण्याचे नियोजन केल्याचे समजते. 

 

 

दि. १० मे पर्यंत मुळा उजवा व डावा कालव्यातून शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले नाही तर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे कोविड - १९ चे नियम पाळून पाणी सुटेपर्यंत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज बारस्कर, संतोष पवार, जिल्हा अध्यक्ष विनोद सिंग परदेशी, जिल्हा सचिव प्रकाश बेरड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष संदीपराव बामदळे, कल्पेश दळे, अशोकराव कुसळकर, लक्ष्मीताई देशमुख, संजय पवार, सतीश पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी दिला आहे.कार्यकारी अभियंत्यांनी लवकरात लवकर पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. अशी मागणी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वर्गातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...