पिकविम्यापासुन वंचीत; पिकविमा हप्ता भरलेल्या बळीराजामध्ये संतापाची लाट - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, १६ मे, २०२१

पिकविम्यापासुन वंचीत; पिकविमा हप्ता भरलेल्या बळीराजामध्ये संतापाची लाट

शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरुन संताप व्यक्त
 

शुभम उत्तरवार

लोहा / जलभूमी वृत्तसेवा 

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत खरीप हंगाम २०२० मधील उत्पन्न आधारित नुकसान झालेल्या ३९ हजार २६९ शेतकर्‍यांना २१ कोटी ९७ लाख ५१ हजार रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. यात सर्वाधीक १६ कोटी ३५ लाखांचा विमा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील भोकर तालुक्याला मिळाला आहे. माहूर तसेच लोहा तालुका निरंक आहे. यामुळे करोडोचा विमा हप्ता भरलेल्या शेतकर्‍यांमध्ये नाराजी पसरुन संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद व मूग या पिकासाठी एकूण नऊ लाख ५५ हजार आठशे ४४ कोटी ६८ लाख रुपयांचा विमा हप्ता इफको टोकियो विमा कंपनीकडे विमा भरला होता. पिके उभे असतांना यंदा अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केलेल्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच काढणीपश्‍चात नुकसान झालेल्या ८२ हजार ३३३ शेतकर्‍यांना एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती. यानंतर शिल्लक शेतकर्‍यांना उत्पन्न आधारित नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती. 

 

कंपनीकडून नुकताच विमा मंजूरीबाबत तपशील जाहीर केला आहे. यात जिल्हा परिषद, कृषी विभाग व महसूल अशा तीन यंत्रणेने काढलेल्या पीक प्रयोगाच्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जिल्ह्यातील ३९ हजार २६९ शेतकर्‍यांना २१ कोटी ९७ लाख ९१ हजार रुपयांचा विमा मंजूर झाल्याचे कळविले. उत्पन्न आधारित विमा नुकसान भरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघातील भोकर तालुक्याला सर्वाधीक १६ कोटी ३५ लाख रुपये विमा मंजूर झाला आहे. तर माहूर तसेच लोहा तालुक्यातील शेतकर्‍यांना मात्र भरपाई मिळाली नाही.

 


तालुकानिहाय मंजूर पिकविमा

अर्धापूर- ४३.७८ लाख (१४७), भोकर- १६.३५ कोटी (१९,८३७), देगलूर- १.२८ कोटी (२,६०६), धर्माबाद- ८५ हजार (४३), हदगाव- ११.०८ लाख (४३२), हिमायतनगर- ८५.५९ लाख (३,४६४), कंधार- एक कोटी (४,३९०), किनवट- ५७.७९ लाख (२,१७४), लोहा- शुन्य, माहूर- शुन्य, मुदखेड- ४.३३ लाख (१००), मुखेड- १.७५ लाख (८६), नायगाव- १.१२ कोटी (२,९८९), नांदेड- ८.०८ लाख (३३१), उमरी- ३९.२८ लाख (२,५५३), बिलोली- ७.१० लाख (११७).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...