बाळासाहेब जाधव
शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा
शेवगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था ढासाळली, अवैध धंदे बोकाळली, वाळूतस्करीच्या गुन्हेगारीत वाढ, पोलिस तडजोडीच्या बैठकीत मग्न, गुन्ह्याचा तपास शून्य या मथळ्याखाली दैनिक जलभूमी मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी शेवगाव उपअधिक्षक कार्यालयातील वादग्रस्त तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा पोलिस मुख्यालयात तातडीने बदल्या केल्या आहेत. तर पोलीस निरीक्षकांचे खास दोन वसुली प्रतिनिधींना हटविण्यात आल्यामुळे गुन्हेगाराशी संबंध असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांत चपराक बसली आहे.
शेवगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था ढासाळल्याने दिवसा ढवळ्या घरफोड्या, जबरी चोऱ्या, वाहनचोरी, दरोडे, रस्तालुट, वाळूतस्करी, दारू, जुगार मटक्याचे अड्डे, शेवगाव येथील हत्याकांड या सारख्या गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने लक्षनिय वाढ होऊन एकाही गुन्ह्याचा तपास लागला जात नाही. सामन्य जनता गुन्हेगारांच्या दहशतीखाली सध्या वावरत असून रक्षण करणारे पोलिस यंत्रणेने कायदा वेशीला टांगल्याने "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीद वाक्य फक्त कागदोपत्री दिसत आहे, पोलिस गुन्हेगाराबरोबर आर्थिक तडजोडीसाठी बैठकात धन्यता मानण्यात मुश्गुल असतात. गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकात मोठा असंतोष निर्माण होत असल्याबाबत दोन दिवसांपूर्वी दैनिक जलभूमी मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचे जनतेनी कौतुक केले आहे.
पोलीस प्रशासन कोरोना काळात अत्यावश्यक असणाऱ्या २२ ऑक्सीजन सिलेंडर जप्त केले होते. सामान्य जनतेस वेठीस धरले जात असल्या बाबत जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांची भेट घेऊन एका राजकीय नेत्यांनी लेखी तक्रार केली होती. पाथर्डी येथील एका व्यक्तीकडे वाळू व्यवसाय सुरू करण्यासाठी फोन करून पैश्याची मागणी केली जात होती. तशी व्हिडिओ व ऑडीओ क्लिपच्या पुराव्या सह जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील व लाचलुचपत विभागाचे उप अधीक्षक हरीश खेडकर यांच्याकडे संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची तक्रार केली आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याने संबंधित पोलिसांनी पोबारा केला असल्याचे बोलले जात आहे. सखोल चौकशी केल्यास अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे अवैध करारनामे उघड होऊन अनेक जण निलंबन अथवा बडतर्फीची कारवाई होऊ शकते. त्या दृष्टीने चौकशी करण्याची मागणी जनतेतून होत आहे.ही कारवाई फक्त कर्मचाऱ्यांवर न करता यामध्ये सहभागी असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळणाऱ्या वर बडतर्फीची कारवाई होणे गरजेचे आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना वरदहस्त असल्याचे बोलले जाते. मंत्रालय कनेक्शन असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक या प्रकारणाचा छडा लावतील का? असा प्रश्न सध्या सोशल मिडीयावर चर्चिला जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शेवगाव उप पोलीस अधीक्षक कार्यालयातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या ? पोलीस कर्मचारी स्वतः हुन हप्ते खोरी गोळा करु शकत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुनच सर्व काही चालू असते. मग असा न्याय का? पोलीस अधीक्षक या अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या करून खातेनिहाय चौकशी करणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून विचारला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...