पोलीसांनी वेळीच दारु बंदी न केल्यास पुन्हा आंदोलन-महिलांचा इशारा
बक्तरपूर / जलभूमी वृत्तसेवा
शेवगांव तालुक्यातील मजलेशहर येथे अवैध धंदे बोकाळले असून अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. येथील अवैध देशी, विदेशी दारु व जुगार अड्डे तातडीने बंद करण्यात यावे.या मागणीसाठी संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मजलेशहर ता.शेवगांव येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे चालू आहेत.दोन वर्षापासून लॉगडाऊन असल्यामुळे कामधंदा नाही. महिलांनी शेतामध्ये मोलमजुरी करायची.रात्री घरी आल्यावर पतीराज्याने दारु पिण्यासाठी पैशासाठी मारहाण करायची.दिवसभर काबाडकष्ट करुन मिळविलेले दोन पैसे मारहाणीच्या भितीपोटी नवरोबांना देवून टाकायचे.असा नित्यक्रम महिलांनी किती दिवस सहन करायचा.
शेवटी संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध केला.
मजलेशहर येथील अवैध धंदे बंद करण्यात यावे. या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच विद्या लोढे, ग्रामसेवक चंद्रकांत देशमुख, माजी सरपंच विक्रम लोढे, पोलीस नाईक बाबासाहेब शेळके, पोकॉ. महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले. पोलिसांनी लगेच अवैध दारू विक्री होत असल्या ठिकाणी छापा टाकला. परंतु त्याठिकाणी काहीच सापडले नाही.
यावेळी मजलेशहरच्या सरपंच विद्या लोढे, सुवर्णा मोटे, वैशाली लोढे, लता जगताप, सिंधुबाई पहिलवान, कमाबाई नरवडे, लताबाई जगताप, वनिता जगताप, हिरा मुगुटमल, नंदा बनकर, शारदा मुगुटमल, ज्योती फासाटे, लताबाई कदम, अलका मिसाळ, रंजना जगधने, पद्मा बोरुडे, सुलभा खरात,शालू मुगूटमल, सुमन पांडव, वंदना माने, सुवर्णा फासाटे याच्यासह अनेक महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी माजी सरपंच विक्रम लोढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले, सरपंच अशोक लोढे, उपसरपंच अशोक लोढे, आसाराम लोढे, भाऊसाहेब गाडेकर, महेश लोढे, प्रशांत लोढे , बबलू लोढे, सुरेश लोढे, यश लोढे, भाऊसाहेब फटांगरे, ऋषी मगर, गुलाब शेख, आप्पा जगधने आदी उपस्थित होते.
...अन्यथा दारु विक्री व मद्यपींचा बंदोबस्त करु - सौ. मोटे
दारुपाई अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत.अनेक महिलांना मद्यपी नव-यांचा त्रास सहन करावा लागत आहे. संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रशासनाला लेखी कळविले आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी अवैध दारू विक्री होणारी बंद करण्यात यावी. अन्यथा दारू विक्री करणारे व दारुड्या लोकांचा आमच्या पद्धतीने बंदोबस्त करु.
सुवर्णा मोटे
अध्यक्षा - दारु बंदी समिती, मजलेशहर
दारू बंदी होणार का ?
शेवगांव तालुक्यात अवैध धंदे सुरू आहेत. या धंद्यावर पोलीस प्रशासनाची करडी नजर असते. यासाठी खास पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक माया गोळा केली जात असल्याचे बोलले जाते. जर अवैध धंदे करण्यासाठी पोलीस प्रशासन हप्ते गोळा करीत असेल तर दारू बंदी कशी होणार ? संतप्त महिलांनी मोर्चा काढून जर या ठिकाणची दारू बंदी झाली नाही. तर समाजाने याबाबत काय भूमिका घ्यायची.मजलेशहर येथील दारुबंदी होणार का ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...