स्वयंघोषित समाजसेवक व बोगस पत्रकारांचा बंदोबस्त करा - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

स्वयंघोषित समाजसेवक व बोगस पत्रकारांचा बंदोबस्त करा

तालुक्यात बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करणे होतेय कठीण
 
बाळासाहेब जाधव 
शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 
------------------------------

शेवगाव तालुक्यात दिवसेंदिवस स्वयंघोषित पत्रकार त्रासदायक ठरत चालले आहेत. या तथाकथीत समाजसेवक, बोगस पत्रकारांच्या त्रासामुळे पोलीस असो की महसूल अथवा अन्य विभागातील अधिकाऱ्यांना आपला सेवा कार्यकाळ पूर्ण करणे कठीण झाले आहे. अनेकांनी विनंती बदलीचा अर्ज वरिष्ठांना देऊन वादविवाद टाळत बदली करुन घेणे पसंत केले आहे. तर कुरघोड्यांना वैतागून काहींनी बदलीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. परिणामी या गोष्टींचा परिणाम तालुक्याच्या विकासाबरोबर, सर्वसामान्य जनतेच्या कामावर होत आहे. 



नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार साहेबांनी अश्यांना वेसण घालून, बंदोबस्त करण्यासाठी पाऊले उचलणे काळाची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेवगाव पोलीस ठाण्यात एकही अधिकारी आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. अपवाद पोलीस निरीक्षक रामराव ढिकले ठरले आहे. पूर्वी महसूल विभागात बदली करून घेण्यासाठी चढाओढ लागायची. आता मात्र शेवगाव तालुक्यात नियुक्ती नको यासाठी वरिष्ठ पातळीवरुन अधिकारी प्रयत्न करतांना दिसून येत आहेत. ही अवस्था पुरोगामी विचारांचा वारसा जोपासनाऱ्या शेवगाव तालुक्याला बाधक ठरत आहे. तालुक्यामध्ये सध्या स्वयंघोषित समाजसेवक, बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाला आहे. 



माहितीच्या अधिकारात अर्ज देवून अधिका-यांना त्रास दिला जात आहे. तडजोडीसाठी अन्य लोकांना मध्यस्थी करण्यासाठी यंत्रणा तरबेज झाली आहे. तर काही स्वयंघोषित मान्यवर पाकीट मारीत धन्यता मानून अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरुन स्वतःचे खिसे गरम करण्यात रमले आहे. यासाठी अत्यंत खुबीने नव्याने पत्रकारिता क्षेत्रात आलेल्या नवोदितांना वापर करण्याचे तंत्र या लबाड लांडग्यांनी अवलंबले आहे. त्यांच्या ध्येय धोरणांना नवोदित मंडळी बळी पडतांना दिसून येत आहेत. आपला 'हेल्मेट' म्हणून वापर होतोय हे ओळखून वेळीच नवोदितांनी सावध होऊन अशा लांडग्याची चाल ओळखायला हवी! 



शेवगाव तालुक्यात घुले, राजळे, ढाकणे, काकडे यांचे राजकीय प्राबल्य आहे. तसेच स्व. मारुतराव घुले पाटील, कॉ. आबासाहेब काकडे, बाळासाहेब भारदे यांच्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या तालुक्यात बदलून येण्यासाठी अधिकारी कचरत असतील तर ही बाब नक्कीच भूषणावह नाही. एखादा अधिकारी चुकीचा असू शकतो, वागू शकतो म्हणून सगळे अधिकारी तसे हे समजणे चुकीचे आहे. सद्यस्थितीत सगळे अधिकारी बदलून जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तसे खाजगीमध्ये देखील जवळच्या व्यक्ती सोबत बोलत आहेत. अधिकारी राजकीय कुरघोडी अथवा स्वयंघोषित समाजसेवक, पत्रकाराच्या भूमिकेला बळी पडू नयेत. नाही तर ही मानसिकता भविष्याच्या दृष्टीने तालुक्यासाठी धोक्याची घंटा आहे. 

प्रशासकीय सेवेत काम करताना सर्वाना सोबत घेऊन अधिकारी चालत असले तरी सर्वांना कोणताही अधिकारी खुश ठेऊ शकत नाहीत, हे वास्तव स्वीकारले पाहिजे. अधिका-यांना राजकीय रोषाला सामोरे जावे लागत असताना काही पत्रकार मंडळी स्वःहितासाठी अधिकाऱ्यावर दबाव टाकतात, नसता बातम्या प्रकाशित करुन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेवगावला नोकरी नको रे बाबा..! अशी त्यांची अवस्था होत आहे. वृत्तपत्र हे विश्वासहर्ताचे प्रतिक आहे, त्याची विश्वासहर्ता टिकविणे हे वार्ताहार यांचे कर्तव्य आहे. 

मात्र सध्याच्या परिस्थितीत अनेकांनी आपले कर्तव्य कमरेला गुंडाळले आणि याचे भान बाजुला ठेऊन कर्तव्याची व्याख्या वेगळी केली आहे. सर्व वृत्तपत्रे समान आहेत, सर्वांना सारखाच अधिकार आहे. परंतु स्पर्धेच्या नावाखाली मीच कसा श्रेष्ठ यासाठी धडपड करणारे पुढे येत आहेत. याची मोठी खंत निर्माण झाली आहे. वृत्तपत्रात काम करताना संस्थेच्या हिताला प्रथम प्राधान्य देणे महत्वाचे आहे. तेवढेच सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापीत करण्याची ही संधी सोडून स्वःताचा मोठेपणा निर्माण करण्याचा काही मंडळी केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. यात अधिकाऱ्यांची गळचेपी होत, असल्याने 'भिक नको पण कुत्रे आवर' असेच काहीसा कार्यभार करण्याची त्यांची मनस्थिती झाली आहे.

 स्व. बाळासाहेब भारदे हे महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री होते. आधी विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते. जिल्ह्यातील पत्रकारितेत बाळासाहेब भारदे यांच्या पुढाकाराने १९४७ मध्ये नगर जिल्हा मराठी पत्रकार संघ ही मराठी पत्रकार परिषदेची शाखा सुरू झाली.१९५१ मध्ये बाळासाहेब भारदे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष झाले. अशी थोर परंपरा लाभलेल्या तालुक्यात, मोजक्या मंडळीमुळे पत्रकारिता क्षेत्राची सुरु झालेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे, पत्रकार क्षेत्राची वाताहत सुरु झाली हे निश्चितच दुर्दैवी आहे.


शेवगाव तालुक्यातील काही पत्रकारांचे कारनामे जिल्हा पातळीवर गेल्याने, काही वृत्तसंस्थांनी स्थानिक प्रतिनिधी न देता, अन्य तालुक्यातील प्रतिनिधीच्या खांद्यावर शेवगाव तालुक्याची धुरा दिली आहे. इतकेच काय नुकतेच उघड झालेल्या प्रकरणामुळे एका संस्थेने बाहेरच्या तालुक्यातील प्रतिनिधीना गळाला लावून शेवगावची जबाबदारी देण्यासंदर्भात हालचाली सुरु केल्याची माहिती मिळत आहे.तालुक्यातून प्रतिनिधी का दिला जात नाही. याचे तालुक्यातील पत्रकारांनी विचार करण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...