लग्न समारंभासाठी नवे नियम - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

लग्न समारंभासाठी नवे नियम

धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाकारली

 

मुंबई / जलभूमी वृत्तसेवा 

 

राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक झाला असून वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मंगळवारी रात्री ८ वाजल्यापासून कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्यात याआधी लागू करण्यात आलेले निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. 

 


 

लग्न सोहळे व सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा लावण्यात आल्या आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात मंगळवारी रात्रीपासून कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १ मेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. अशातच लग्न समारंभ व राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

 

विकेंड लॉकडाऊन लागू झाल्यानंतर राज्यात लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली होती. आता लग्न समारंभासाठी पाहुण्यांची संख्या निम्म्यावर आली आहे. आता फक्त २५ जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार आहे. कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. हॉलवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. 

 

करोना चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट जवळ बाळगणे आवश्यक आहे. जर कर्मचाऱ्यांचे लसीकरण व चाचणी झाली नसल्यास दंड आकारण्यात येणार आहे. 'ब्रेक द चेन'च्या नियमांनुसार राजकीय सभांनाही परवानगी नाकारली आहे. एखाद्या नियोजित निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घ्यायची असल्यास पक्षाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या नियमांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...