श्रीरामपूर चे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करणार तपास
भाऊ कदम
बोरी फाटा / जलभूमी वृत्तसेवा
राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडून काढून घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आता हा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग केल्याची माहिती मिळाली आहे.
यामुळे तपासाला नक्की गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पत्रकार दातीर हे आपल्या घरी परतत असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ तील गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते.
त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला भादवि कलम ३६३,३४१ तसेच त्यात वाढीव कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपीला लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी ( वय २५ ) राहुरी व तोफिक मुक्तार शेख ( वय २१ ) राहणार राहुरी फॅक्टरी, तालुका राहुरी या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.
सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी सह अन्य एक जण फरार असून गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे कडून गुन्ह्याचा तपास काढून घेत पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके श्रीरामपूर यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहे.
दरम्यान राहुरी पोलीस तपासात अपयशी ठरत असल्याने हा तपास काढून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिल्याचे बोलले जात आहे. तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा पत्रकार बांधवामधून व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...