अपहरण करून दक्ष पत्रकार संघाच्या अध्यक्षाची निर्घृण हत्या - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

अपहरण करून दक्ष पत्रकार संघाच्या अध्यक्षाची निर्घृण हत्या

ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निषेध करून या घटनेची कसून चौकशी करण्याची मागणी

 

राहुरी

 
राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार व माहितीचा अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता यावरून राजकारणही पेटण्याची चिन्हे आहेत.


rohidas datir yanchi hatya

दातीर यांचे काल दुपारी अपहरण झाले होते. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. पत्रकार दातीर मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. सातपीर बाबा दर्गाजवळून जात असताना एका चार चाकी वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण करून गाडीत बसविले आणि निघून गेले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तेथे धाव घेतली. दातीर यांची दुचाकी आणि पायतील चप्पल घटनास्थळीच आढळून आली. दातीर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता.


पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम हाती घेतली. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा तपास लागला. पोलिसांनी ते वाहन ताब्यात घेतले. मात्र आरोपी मिळाले नाहीत. आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याची माहिती पुढे आली आहे. दातीर यांनी एका प्रकरणात माहिती आधिकार वापरून केलेल्या पाठपुराव्यामुळे अडचणीत आल्याच्या कारणातून त्यांनी ही हत्या केली असावी असा संशय व्यक्त होत आहे.


रात्री राहुरी कॉलेज रोड परिसरात दातीर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दातीर यांची पत्नी सविता यांनी राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी अनेक वेळा दातीर यांच्यावर हल्ला झाला होता.


राहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या दातीर यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, स्टेशन रोड परिसरातील १८ एकरचा प्लॉट, नगर मनमाड रोड वरील एका हॉटेल इमारत या विषयांचा त्यांनी पाठपुरावा केला होता. काही प्रकरणांचे खटले औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. याचा हत्येशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत. 


त्यांची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.


पत्रकार संघाकडून निषेध
दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक, अध्यक्ष यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करून घटनेचा निषेध करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...