माळवाडगांव / जलभूमी वृत्तसेवा
दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा गैरफायदा घेत लाकूड तस्कर वृक्षांच्या बुंध्याखाली विस्तव टाकून हजारो हिरवेकंच वृक्षांची कत्तल करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रीरामपूर ते नेवासा आणि खोकर फाटा ते खानापूर रस्त्यालगतच्या शेकडो वृक्षांची याच पद्धतीने जाळून कत्तल केली जात आहे. आग पसरल्याने परिसरातील झुडुपी व जैवविविधतेसही धोका निर्माण झाला आहे. खोकर फाटा ते खानापूर येथे रस्त्यावर शेकडो झाडांची कत्तल होत असल्याचे चित्र आहे. याठिकाणी आग लावून गवत जाळण्यात आले आहे.
झाडांचे केवळ बुंधेच शिल्लक आहेत. तस्करांनी झाडांची खोडे तोडून नेल्याचे स्पष्ट होते. वृक्षतोडीवर बंदी असून त्यासाठी वन विभागाचे कडक कायदे अस्तित्वात आहेत. त्यापासून वाचण्यासाठी लाकूड तस्करांनी नामी शक्कल लढविली आहे. झाडांच्या बुंध्याखाली रात्रीच्या वेळी पेटलेले विस्तव टाकले जातात. तापमान जास्त असल्यामुळे विस्तव विझत नाहीत. त्यामुळे झाड काही वेळातच पेट घेते. दहा ते बारा तासांमध्ये हिरव्या झाडांचा बुंधा पूर्ण जडतो आणि झाड कोसळते. झाड कोसळल्यानंतर लाकुडतोडे आधी फांद्या तोडून घेऊन जातात आणि काही दिवसांनी झाडाचे पूर्ण खोड घेऊन जातात. या पद्धतीने दरवर्षी हजारो वृक्षांची राजरोसपणे कत्तल होते.
वृक्षाला लागलेल्या आगीत परिसरातील गवत छोटी-मोठी झाडे झुडूपेही जळून खाक होतात. त्यामुळे जैवविविधतेचाही ऱ्हास होत आहे. वृक्षांची होणारी अशाप्रकारची कत्तल रोखण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाही, हेच दुर्दैव आहे.रस्त्यालगत असलेली झाडे बांधकाम विभागाच्या ताब्यात असतात. झाडांचे रक्षण व देखभालीची जबाबदारी बांधकाम विभागाकडेच असते. जाळून वृक्षांची कत्तल करण्याच्या प्रकारात काही वर्षांपासून वाढ झाली आहे. याकडे बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या देखभालीसाठी मैलकुलींची नियुक्ती करण्यात येते. तेही झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष करतात.
लाकूड तस्करीला उधाण आले आहे. याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. शासनाने कडक मोहीम राबवायला हवीय या प्रकाराकडे गांभिर्याने बघायला हवे.सार्वजनिक वनविभागाने लावलेल्या हजारो वृक्षांची राजरोसपणे कत्तल करण्यात येत आहे. परिणामी पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने या विरोधात कडक मोहीम राबवायला हवी. झाड जळताना दिसल्यावर नागरिकांनीही ते त्वरीत विझवायला हवे. तसे होतांना दिसत नाही. या बाबत वनविभागाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचे अस्तित्व संपण्यास वेळ लागणार नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...