खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लुटमार? प्रशासनाचे दूर्लक्ष - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, ९ मे, २०२१

खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लुटमार? प्रशासनाचे दूर्लक्ष

मनसे तालुका अध्यक्ष गणेश रंधावणे यांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार
 

बाळासाहेब जाधव 

शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 

 

कोरोना आजाराचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतांना तीव्र लक्षणे असलेले रुग्ण ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावे, यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती होऊन उपचार घेत आहेत. यशस्वी रित्या उपचार घेऊन बरे झालेल्या व औषधोपचार सुरु असतांना मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भरमसाठ बिल देवून आर्थिक लुटमार केली जात आहे. 

 

 

तालुका प्रशासन या गंभीर बाबीकडे दूर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे तालुका अध्यक्ष गणेश रंधावणे यांनी केला आहे. जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात रंधावणे यांनी म्हटले आहे की, खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लुटमार होत असल्याने कोरोना हॉस्पिटल प्रशासन व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये अनेकदा वाद निर्माण होत आहे. हॉस्पिटल प्रशासनाचा अनमोल वेळ वाया जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. 

 

प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना आखण्यात याव्यात. ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. रुग्णांची होणारी लूट व आपत्ती काळात सुसूत्रता आणण्यासाठी हॉस्पिटलकडून दिल्या जाणाऱ्या बिलाची तपासणी करण्यासाठी तालुका स्तरावर महसूल, आरोग्य विभाग यांचे संयुक्त समिती स्थापन करुन पथकाकडून बिल तपासणी करण्यात यावी. हॉस्पिटलमधून रुग्णांना घरी सोडताना, एक दिवस अगोदर सदरचे बिल 'त्या' पथकाकडून तपासणी करण्यात येऊन, तहसीलचा शिक्का व स्वाक्षरी असलेले बिल रुग्णांना देण्यात यावे. तेच बिल रुग्णांकडून आकारण्यात यावे. 

 

सदर बिल रुग्णांना देतांना त्या बिलामध्ये 'त्या' रुग्णाला देण्यात आलेल्या उपचाराची सर्व माहिती नमूद करणे बंधनकारक करण्यात यावे. रुग्ण भरती झालेली तारीख, त्याला देण्यात आलेल्या औषधांची माहिती, तारीख निहाय रुग्णाची ऑक्सिजन पातळी, ताप, बीपी, रेमडेसिवीर इंजेक्शन, रोज किती ऑक्सिजन देण्यात आला आदी गोष्टींचा उल्लेख असणे बंधनकारक करावे..या गोष्टीमुळे रुग्णांची लूट थांबवता येईल. रुग्णाला घरी सोडताना तसेच मृत पावल्यानंतर सदर रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देतांना बिलामुळे उपस्थित होणारे वाद टाळणे शक्य होणार आहे. 

 

याच बरोबर रुग्णाला दिल्या जाणाऱ्या उपचारामध्ये अधिक पारदर्शकता येऊन हॉस्पिटल प्रशासन, नातेवाईक यांच्यात समन्वय तयार होईल. या प्रमुख मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाअधिका-यांकडे करण्यात आल्या असुन या मागण्यांचा विचार होऊन तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...