निकेत फलके
अमरापुर प्रतिनिधी
कोरोना साथरोगात प्रवासी सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना अद्यापही फ्रंट लाइन वर्कर म्हणून करोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली नाही. एसटीच्या ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना लस घेणे शक्य आहे. मात्र, ते फ्रंट लाइन वर्कर नाहीत का, त्यांना सरसकट लस का नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कोरोना महामारीत खरे कोरोना यौध्दा प्रतिक्षेत आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेत एसटी कर्मचाऱ्यांनी लाखाहून अधिक श्रमिकांची वाहतूक केली. अनलॉकमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव कायम असतानाही सामान्य प्रवासी वाहतूक दिली. आता दुसऱ्या लाटेतही सर्व आस्थापना बंद असताना एसटी कर्मचारी सेवा बजावत आहेत.करोनाची दुसरी लाट अधिक घातक असून, लसीकरण हाच त्यावरील प्रभावी उपाय असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.एसटी कर्मचाऱ्यांचा थेट प्रवाशांशी संबंध येतो. या कामगारांना करोनाचा संसर्ग लवकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आतापर्यंत एसटीचे सुमारे १०० पेक्षा जास्त कर्मचारी करोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत.अनेक कर्मचारी बाधित झाले आहेत. या परिस्थितीत कर्मचाऱ्यांना तात्काळ करोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी एसटी कामगार संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.सध्या महापालिकेने प्रथम डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली आहे. महापालिकेतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही प्राधान्याने लस देण्याचे कामकाज सुरू केले आहे. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात यावी,अशी मागणी जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...