किरण काळे
पैठण / जलभूमी वृत्तसेवा
पैठण तालुक्यातील बालानगर येथील बोगस डॉक्टरांवर कारवाई व वृत्त संकलना साठी गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पत्रकारांवर गावातील बोगस डॉक्टर समर्थकांनी भ्याड हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.१९) रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान घडली. याप्रकरणी बंगाली बोगस डॉक्टरसह अन्य काही जणांवर पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, बालानगर येथे बोगस डॉक्टर असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. भुषण आगाज यांना मिळाली, त्यावरुन डॉ. आगाज हे पत्रकार मोशीन शेख यांच्या सह दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत बालानगर येथील ओम साई स्टोअर्स च्या बाजूला असलेल्या बोगस डॉक्टर अरबिंदो सुबोल बिश्वास यांच्या दवाखान्यावर पथकाने धाड टाकली. यादरम्यान आरोग्य पथकाने केलेल्या चौकशीत त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय शिक्षण पात्रता आढळून आली नाही. असे असताना ही त्यांच्याकडे अल्युपॅथीक औषधे, इंजेक्शन साठा व शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे आढळून आली. त्याच्याकडे वैद्यकीय व औषध परवान्याची मागणी केली असता त्याने आरडाओरडा करून गावातील लोक जमा केले.
जमलेल्या जमावातील बोगस डॉक्टरास समर्थन करणारे भगवान गोर्डे व शिवाजी गोर्डे (दोघे रा बालानगर) यांनी आरोग्य पथक व पत्रकारास कारवाई करु नका असे म्हणत शिवीगाळ करून लोटलाट केली व तेथुन इंजेक्शन साठा, शस्त्रक्रिया उपकरणे घेऊन बोगस डॉक्टर अरबिंदोला पळून जाण्यास मदत केली. याप्रकरणी डाॅक्टर भासवून लोकांच्या जीवाशी खेळ करुन फसवणूक करु पाहणाऱ्या बोगस डॉक्टर अरबिंदो बिश्वास सह विनाकारण जमाव व शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल भगवान गोर्डे,शिवाजी गोर्डे, रवि भुजबळ,आशीफ अब्बास शेख यांच्यासह अन्य काही जणांवर कलम ३५३, ४२०, ३२३, ५०४, १८८, २६९, २७१, २७३ भादंवी कलम ३३, ३४, ३६, ३८ वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ कलम ५१ (ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस करत आहेत.
पत्रकार संघटनेकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...