एक गाव, एक वाण मोहिमेअंतर्गत कपाशीची लागवड - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, ८ मे, २०२१

एक गाव, एक वाण मोहिमेअंतर्गत कपाशीची लागवड

शेतकऱ्यांशी चर्चेनंतर कपाशीचे वाण ठरविणार - कुंढारे
 

बाळासाहेब जाधव 

शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 

 

शेवगाव तालुका कृषी विभागामार्फत येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कापूस पिकाची लागवड करताना "एक गाव एक वाण" या मोहिमेअंतर्गत शेवगाव तालुक्यातील देवटाकळी गावाची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील वर्षी देवटाकळी गावामध्ये कापूस पिकाचे अधिक उत्पन्न दिलेल्या कापूस वाणाची निवड शेतकऱ्यांशी चर्चा करून ठरवली जाणार आहे. 

 

 

निवड झालेल्या कापूस वाणाचे एकुण किती बियाणे लागणार आहे. त्याची मागणी तालुका कृषी कार्यालयाकडे करण्यात येणार आहे. मागणीनुसार ठरलेल्या एकाच वाणाचे बियाणे नियमित बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना गावपातळीवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.अशी माहिती कृषी सहाय्यक ए. ए. कुंढारे यांनी दिली. 

 

मोहीमेचे थोडक्यात फायदे :- 

 

गावामध्ये एकच वाण असलेल्या गावातील कापसाची गुणवत्ता एकसारखी असल्याने हा कापूस खरेदी करण्यासाठी जिनींग मिलशी तालुका स्तरावरुन समन्वय साधून जास्तीत जास्त भावाने कापूस खरेदी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. एरवी आपण कापूस पिकाचे वेगवेगळे वाण लावत असल्याने वेगवेगळ्या वाणांची वाढीची अवस्था वेगवेगळी असल्याने किडींना जास्त दिवस अन्न उपलब्ध होत असते. त्यामुळे बोंडअळीसह इतर सर्व किडींचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होत नाही... याउलट एकच वाण असल्यास किडींना जास्त दिवस अन्न उपलब्ध होत नाही व पर्यायाने किडींचे प्रभावी नियंत्रण सहज शक्य होते. 

 

एकच वाण असल्याने सर्व क्षेत्रावरील कापूस पिक एकाच वेळी काढणीस तयार होते. त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण क्षेत्रावरील प-हाटी काढून टाकण्यात येईल . अशाने संपूर्ण क्षेत्रावरील फरदड निर्मुलन एकाच वेळी होऊन भविष्यात बोंडअळींचे कोषच शिल्लक राहणार नाहीत. व आपल्या परिसरातून बोंडअळीचे उच्चाटन होण्यास मदत होईल. आपल्या वातावरणात व जमिनीमध्ये अधिक उत्पन्न देणा-या वाणाची आपण निवड केलेली असल्याने निश्चितच एकुण उत्पादन वाढण्यास मदत होईल. किडींना जास्त दिवस अन्न उपलब्ध न झाल्याने नैसर्गिकरित्या व कमीत कमी औषधे फवारणीमध्ये प्रभावी किड नियंत्रण होऊन एकुण खर्चात बचत होण्यास मदत होईल. 

 

देवटाकळीमध्ये सध्या सुरू असलेल्या कोव्हीड - १९ साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियोजन गावातील व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, ऑनलाईन झुम मिटींग व फोनवर संपर्क करूनच करायचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सकारात्मक विचार करून ज्यांना येत्या खरीप हंगामात कापूस पिक घ्यायचे आहे. त्यांनी आपले नाव, मोबाईल नंबर, कापूस लागवड करायचे क्षेत्र व पसंतीचा एक वाण याची माहिती कृषी सहाय्यक ए.ए. कुंढारे यांना वैयक्तिक फोन करून द्यावी किंवा आपल्या देवटाकळीतील शेतकरी कृषी सेवा केंद्राचे संचालक अनिकेत खरड किंवा ज्ञानेश्वर कृषी मैत्रेय शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष बापूसाहेब खरड यांच्याकडे लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

 


शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे - खरड

तालुका कृषी कार्यालयाने एक गाव, एक वाण मोहिमेअंतर्गत कपाशी लागवडीसाठी आमच्या देवटाकळी गावाची निवड केली आहे. जायकवाडी पाणीपट्यातील गाव असल्याने उस व कपाशी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. एक गाव एक वाण मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांचे हित आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे.
 
ज्ञानदेव खरड,
सरपंच, देवटाकळी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...