दैनिक जलभूमीच्या वृत्ताची दखल, अखेर त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, ३ मे, २०२१

दैनिक जलभूमीच्या वृत्ताची दखल, अखेर त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

जबाबदार अधिका-यांवर कारवाई होणार का ?
 

बाळासाहेब जाधव

शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 

 

पकडलेली वाळूची ट्रक सोडून देणे व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालून देण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितल्या प्रकरणी शेवगाव पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील तिघा पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकारणात जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिका-यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील कारवाई करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. 

 


 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसंत कान्हु फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी), संदिप वसंत चव्हाण (रा. पोलीस वसाहत, शेवगाव), कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांचे नावे आहेत. हे तिघे पसार झाले आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तक्रारदार यांची वाळूची ट्रक उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने ७ एप्रिल रोजी पकडली होती. त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याचे मोबदल्यात व वाळु वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती १५ हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. 

 

तक्रारदार यांनी सर्व पुरावे देवूनही पोलीस प्रशासन कारवाई करण्यासाठी टाळा टाळ करत होते. या सर्व प्रकारणाचे पुरावे दैनिक जलभूमीच्या हाती पडताच महाराष्ट्र दिनी दि. १ मेच्या अंकात शेवगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था ढासाळली, अवैध धंदे बोकाळली, वाळूतस्करीच्या गुन्हेगारीत वाढ, पोलिस तडजोडीच्या बैठकीत मग्न, गुन्ह्याचा तपास शून्य या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी शेवगाव उपअधिक्षक कार्यालयातील वादग्रस्त तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा पोलिस मुख्यालयात तातडीने बदल्या केल्या आहेत. तर पोलीस निरीक्षकांचे खास दोन वसुली प्रतिनिधींना हटविण्यात आल्यामुळे गुन्हेगाराशी संबंध असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांत चपराक बसली आहे. 

 

दि.२ रोजी पुन्हा दैनिक जलभूमी ने वाळू हप्तेखोरी भोवली, तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या? पोलीस निरीक्षकांच्या दोन वसुली प्रतिनिधीला हटवले! पोलीस अधिका-यांवर कारवाई होणार का? या मथळ्याखाली पुन्हा आवाज उठविला त्याची प्रशासनाने तातडीने दखल घेत तीन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने गुन्हे दाखल केले असल्याने सर्वसामान्य जनतेतून स्वागत केले जात आहे.

 


जबाबदार पोलीस अधिका-यांवर कारवाई कधी होणार ?

वाळू हप्ते खोरीच्या प्रकारणाला वाचा फोडण्याच काम दैनिक जलभूमी ने केले. अनेकांनी सोशल मीडियावर व भ्रमध्वनीवरुन वृत्तपत्राचे अभिनंदन केले. हे प्रकरण मंत्रालयाशी कनेक्शन असल्याचे बोलले जाते. मंत्रालयाशी कनेक्शन असल्याने फक्त या तीन कर्मचाऱ्यांना बळीचे बकरे न ठरवता या प्रकरणात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई कधी होणार ? असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक व लाचलुचपत अधिकारी कर्तव्य दक्ष असल्याने ते या प्रकारणाचा छडा लावतील. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...