बालेकिल्ल्यातील वैद्यकीय अधिका-याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा - झिंज - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, १४ मे, २०२१

बालेकिल्ल्यातील वैद्यकीय अधिका-याच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा - झिंज

आरोग्य समितीच्या सभापतीच्या गावातील आरोग्य केंद्राची तक्रार
 

दहिगाव- ने / जलभूमी वृत्तसेवा 

 

शेवगाव तालुक्यातील दहीगाव - ने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिका-यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची चौकशी करून तात्काळ निलंबित करावे. अन्यथा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या शासकीय निवास्थानासमोर शासनाने घालून दिलेल्या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक नियम पाळून बेमुदत आमरण उपोषण केले जाईल. असा इशारा शेवगाव तालुक्यातील मजलेशहर येथील सामाजिक कार्यकर्ते सतीष झिंज यांनी आरोग्य मंत्र्याला पाठविलेल्या निवेदनात दिला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तथा आरोग्य समितीच्या सभापतीच्या गावातील आरोग्य केंद्राची तक्रार करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे.

 

 

आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहीगाव - ने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचा स्वतः कुकाणा येथे दवाखाना आहे. आरोग्य केंद्रातील मेडीसीनचा त्यांच्या खाजगी रुग्णालयात सर्रास वापर केला जातो. सर्व सामान्य नागरिकांना औषधासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पैश्याची मागणी केली जात आहे. जिल्हा परिषदेमार्फत हॉस्पिटलच्या सुविधासाठी काही कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्या ठिकाणी सर्व सुविधा असताना वैद्यकीय अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे सर्व सुविधा बंद स्थितीत आहेत. शासनाचा जीआर पाच वर्षानंतर एम.ओ. ची बदली होणे बंधनकारक असतांना काही राजकीय पुढाऱ्यांच्या आशिर्वादाने वैद्यकीय अधिकारी गेले २५ वर्षांपासून एकाच ठिकाणी नोकरी करून राजकीय अड्डा चालवत आहेत. 

 

कोविड लसीकरणातही अनियमितता असून स्थानिक राजकीय बगलबच्यांच्या नातेवाईकांना वेगवेगळ्या तालुक्यातून आणून तेथे वशिलेबाजीने लसीकरण केले. लसीकरणासाठी सर्व सामान्य नागरिकाचे हाल होत आहे. ७ दिवसांत या भ्रष्ट अधिकाऱ्याची संपूर्ण चौकशी करून कारवाई न झाल्यास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या शासकीय निवास्थानासमोर शासनाने घालून दिलेल्या कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक नियम पाळून बेमुदत आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. सतीष बंडू झिंज यांनी निवेदनाच्या प्रति केंद्रीय आरोग्य मंत्री, दिल्ली, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, अध्यक्षा, जिल्हा परिषद, अहमदनगर, जिल्हाधिकारी, अहमदनगर, तहसीलदार, शेवगाव, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, शेवगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.

 


जि.प.कडून बदलीचे नियम धाब्यावर

शासनाच्या नियमानुसार एकाच ठिकाणी पाच वर्षापेक्षा जास्त काळ नोकरी करता येत नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हा नियम पायदळी तुडवून, धाब्यावर बसवला आहे. दहिगाव- ने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिका-यांनी राजकीय वजन वापरून गेल्या पंचवीस वर्षापासून एकाच ठिकाणी नोकरी करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व आरोग्य समितीच्या सभापती दोन्ही जबाबदा-या राजश्री ताई घुले यांच्या कडे असल्याने त्या या वैद्यकीय अधिका-याची बदली करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...