वाळू हप्तेखोरीतील पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात ! - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, २२ जून, २०२१

वाळू हप्तेखोरीतील पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात !

तीन ही आरोपींना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी, जबाबदार अधिका-यांवर कारवाई होणार का ?
 
अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा

शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील तीन पोलीस कर्मचार्‍यांवर १५ हजार रूपये लाच मागणीचा शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यांना जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर ते तिघे कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर झाले. लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता तिघांना न्यायालयाने दि.२४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
 

एप्रिल महिन्यामध्ये वाळूची वाहतूक करणारे एक वाहन उपअधीक्षक मुंढे यांच्या पथकातील वसंत कान्हु फुलमाळी, संदीप वसंत चव्हाण व कैलास नारायण पवार (रा. पाथर्डी) यांच्या पथकाने पकडले होते. हे वाहनावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी या कर्मचार्‍यांनी वाळू व्यावसायिकाकडे १५ हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत त्या व्यावसायिकाने नगरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.मात्र कुठलीही दखल घेतली जात नव्हती. दैनिक जलभूमी ने दि.२ मे रोजी या संदर्भात बातमी प्रसिद्ध करताच पोलीस प्रशासन खरबडून जागे होत लाच मागितली जात असल्याची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यातून तक्रारीत तथ्य आढळून आले. लाच मागणीचा पुरावा एसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाला. त्यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. लाचलुचपत विभागाकडून त्यांचा शोध सुरू होता.दिड महिना उलटला तरी शोध घेण्यात तपासी अधिकारी अपयशी ठरले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपासाबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला. वरिष्ठ पातळीवरून सदर आरोपी फरार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.दरम्यानच्या काळात आरोपींच्यावतीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु न्यायालयाने तिघांचा जमीन अर्ज नामंजूर केला होता. शेवटी हे पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर झाले. लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांना अटक केेली आहे.
 
संपूर्ण हप्तेखोरी चा तपास होणार का ?

शेवगाव तालुक्यात वाळु हप्ते खोरी चांगलीच गाजली. पाथर्डी तालुक्यातील एका वाळु व्यावसायिकाचे वाहन पकडून १५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. हि कारवाई सदर व्यावसायिक हप्ता देत नसल्याने करण्यात आली.दैनिक जलभूमी ने आवाज उठविल्यानंतर त्या व्यावसायिकाच्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग फक्त त्या एका तक्रारीची चौकशी करणार का ? संपूर्ण हप्तेखोरी चा तपास होणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
 

जबाबदार अधिका-यांवर कारवाई होणार का?

शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांकडून संबधीत अधिका-याची चौकशी करण्यात आली. मात्र पुढील कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. तीनही कर्मचाऱ्यांना अटक केल्याने आता जबाबदार अधिका-यांवर कारवाई होणार का ? किंवा पोलीस प्रशासनाची बदनामी नको म्हणून पाठीशी घालणार ? याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...