तलाठ्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

तलाठ्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित

ढोरजळगांव मंडळातील २९३ शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत
 
ढोरजळगांव :जलभूमी वृत्तसेवा 
----------------------------------

शेवगांव तालुक्यातील ढोरजळगांव मंडळातील ढोरजळगांव,गरडवाडी व मलकापुर या गांवातील २९३ शेतकरी महसुलच्या कामगार तलाठ्यांच्या मनमानी व आडमुठ्या धोरणामुळे ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टी अनुदानापासुन वंचित राहीले असुन वेळोवेळी पाठपुरावा करूनही शेतक-यांना वर्ष उलटत आले तरी शेतक-यांच्या खाती अनुदान जमा करण्यात आले नसुन पुढील आठ दिवसात अतिवृष्टीचे अनुदान शेतक-यांच्या बँकखाती जमा न केल्यास शेवगांव- पांढरीपुल महामार्गावर रस्तारोको आंदोलनाचा इशारा ढोरजळगांवचे माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 



देशमुख यांनी संबधितांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२० मध्ये ढोरजळगांंव मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले होते. त्यानंतर पंचनामे करून ६० % नुकसान गृहीत धरून काही शेतक-यांना सुरूवातीला अनुदान देण्यात आले. मात्र काही शेतक-यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होऊनही कामगार तलाठ्यांनी याद्या वेळेत न दिल्या गेल्याने ( दिरंगाईमुळे ) २९३ शेतकरी अजूनही अनुदानापासुन वंचित असुन शेतकरी गेल्या पाच महिन्यापासुन कामगार तलाठी व मंडळ आधिकारी यांच्याकडे अनुदानाची मागणी करत आहेत. 

त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असुन संपुर्ण तालुक्याला अनुदान मिळालेले असताना ढोरजळगांव मंडळातील शेतक-यांवरच अन्याय का? केला जात आहे. तरी तहसीलदार अर्चना पागिरे यांनी जातीने लक्ष घालून अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतक-यांना त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात यावे. अन्यथा रस्तारोकोचा इशारा देशमुख यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, कृषिमंत्री, महसुलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...