बदनामीच्या भितीने एकाची झाडाच्या फांदीला गळफास घेवून आत्महत्या, तालुक्यात खळबळ - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

बदनामीच्या भितीने एकाची झाडाच्या फांदीला गळफास घेवून आत्महत्या, तालुक्यात खळबळ

पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल
 
शिवाजी खरड 
देवटाकळी / जलभूमी वृत्तसेवा 

एका महिलेसोबतचा फोटो तयार करून तिच्याशी तुमचे अनैतिक संबंध आहेत. अशी बदनामी करू म्हणून वारंवार पैशाची मागणी होत असल्याने शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. 16 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान घडली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली. संभाजी साहेबराव खरड ( वय- 55 रा. देवटाकळी ता. शेवगाव ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरण मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात भाऊराव ऊर्फ मधुकर पोपट वाघमारे, शरद आण्णा वाघमारे व कैलास रतन वाघमारे ( तिघे रा. देवटाकळी ) अशा तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश संभाजी खरड रा. देवटाकळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील भाऊराव वाघमारे, शरद वाघमारे व कैलास वाघमारे या तिघांनी संभाजी साहेबराव कराड यांचा फोटो एका महिलेच्या फोटोशी जोडून तुमचे या महिलेशी अनैतिक संबंध आहेत. तुमची सर्वत्र बदनामी करू. असे म्हणत मागील तीन महिन्यापासून त्रास देत सुमारे चार लाख रुपये उकळले आहेत. 


आता पैसे दिले आहेत. यापुढे बदनामी करू नका. असे सांगितले होते. मात्र तरीही वरील तिघांनी पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा आठ लाख रुपयांची मागणी करत पैसे दिले नाही तर बदनामी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच काही दिवसांपूर्वी देवटाकळी ग्रामपंचायतीसमोर संभाजी खरड यांना भाऊराव वाघमारे यांनी लोखंडी गजाने मारहाण केली होती. या मारहाणीत संभाजी खरड यांचा हात फँक्चर झाला होता. या तिघांकडून पैशाची मागणी करत बदनामीची धमकी देण्यात येत होती. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून संभाजी खरड यांनी शनिवार दि. 16 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास संभाजी खरड यांनी घराशेजारी असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी लक्षात आल्यानंतर संभाजी खरड यांना शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी संभाजी खरड मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी वरील तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी खरड यांच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात करत ठिय्या आंदोलन करत गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी सर्व घटनेचा तपशील घेतल्यानंतर वरील तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर दुपारी 4 वाजता मृतदेह ताब्यात घेत सायंकाळी 6 वाजता संभाजी खरड यांच्यावर देवटाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सपोनि शेळके करत आहेत.यातील आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी.अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...