भायगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उद्या उपोषण - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

भायगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात उद्या उपोषण

बेलदार वस्ती ला पाणीपुरवठा करण्याची मागणी
 
शेवगाव /जलभूमी वृत्तसेवा 
-----------------------------

शेवगाव तालुक्यातील भायगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचे पंचायत समिती कार्यालयासमोर आज सोमवार दि. १३ पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे. अशी माहिती आण्णासाहेब दुकळे यांनी दिली आहे. सभापती व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे भायगाव गावठाण लगत असलेल्या बेलदार वस्तीवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. येथील महिलांना कामधंदे सोडून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.



बेलदार वस्तीला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मासिक व ग्रामसभेत अनेक वेळा विषय घेऊन ठराव घेण्यात आला आहे. मात्र या ठरावावर पुढील कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. बेलदार वस्तीला दि. १२ डिसेंबर पर्यंत पाणी पुरवठा केला नाही तर सोमवार दि. १३ डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा आण्णासाहेब दुकळे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीला घरचाच आहेर

भायगाव ता. शेवगाव येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. बेलदार वस्तीला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे उपोषण त्यातच पंचायत समितीची एकहाती सत्ताही राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने घरचाच आहेर दिला असल्याची कार्यकर्त्यांमध्ये खमंग चर्चा चालू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...