साखर सम्राटांचा आदेश धाब्यावर, उस तोंडणी कामगार मालामाल ? - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

साखर सम्राटांचा आदेश धाब्यावर, उस तोंडणी कामगार मालामाल ?

ऊसतोडणी कामगारांवर कुणाचाच वचक नसल्याने शेतकरी आला मेटाकुटीस
 
बाळासाहेब जाधव 
शेवगाव / जलभूमी विशेष वृत्त 
---------------------------------- 

शासन व साखर आयुक्ताच्या यांच्या रेट्यामुळे जवळजवळ सर्वच साखर कारखाना प्रशासनाने उस तोंडणी कामगारांनी तोंडणीसाठी शेतकऱ्यांना वेठीस न धरता पैशाची मागणी करु नये ? शेतकऱ्यांही उस तोडणीसाठी पैसे देवू नये ? असे दुहेरी आदेश दिले आहेत. मात्र उसतोडणी कामगारांनी साखर सम्राटांचा आदेश धाब्यावर बसवून कारखाना प्रशासनाला दाद न देता व्यवस्थित गाळप सुरू होत नाही तेच पैशाची मागणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. 



नाईलाजास्तव शेतकऱ्यांना उसतोडणी कामगारांची मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. गळती हंगाम सुरू होवून एक महिना झाला आहे. सुरुवातीला अवकाळी पावसामुळे उसतोडणी थंडावली होती. आता सर्वच कारखान्याने गती घेतली आहे. लोकनेते मारुतराव घुले पाटील श्री ज्ञानेश्वर साखर कारखान्याने साखर गळीतामध्ये आघाडी घेतली आहे. शेवगाव तालुक्यामध्ये वृध्देश्वर, गंगामाई, केदारेश्वर, ज्ञानेश्वर सह इतर कारखान्याने गावनिहाय उसतोडणीचे नियोजन केले आहे. 

दरवर्षी उसतोडणी कामगारांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरुन उसतोडणी साठी पैशाची मागणी केली जाते. यावर्षी अनेक साखर कारखाना प्रशासनाने उसतोडणीसाठी पैसे देवू नये असे आवाहन केले असले तरी उस तोडणी मजूरांना दरवर्षी लागलेली चटक थांबविण्याचे मोठे आव्हान कारखाना प्रशासनापुढे आहे. काही साखर सम्राट मात्र कागदी घोडे नाचविण्यात पटाईत असल्याने आदेश काढून मोकळे झाले. 

मात्र उस तोडणी कामगारांवर कुठलाही वचक नसल्याने शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला असल्याचे पहावयास मिळत आहे. साखर कारखाना प्रशासनाने काढलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कारखाना प्रशासन जबाबदार - बामदळे

उस तोडणीसाठी कामगार दरवर्षी पैशाची मागणी करतो. पैसे दिले नाही तर उसाला कोयता लावत नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी नुसार प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने सहकार आयुक्तांकडे आम्ही तक्रारी केल्या. सहकार आयुक्तांनी साखर कारखाना प्रशासनाला तंबी दिली. कारखाना प्रशासनाने उसतोडणी मजूरांना उसतोडणी साठी पैसे न घेण्याचे आदेश दिले. सदर आदेशाला उसतोडणी मजूरांनी केराची टोपली दाखवत आपली पोळी भाजवून घेण्यात मग्न आहेत. यावर कारखाना प्रशासनाचा कुठलाही वचक नसल्याने याबाबीला कारखाना प्रशासन जबाबदार आहे.

संदीपराव बामदळे
तालुका अध्यक्ष - प्रहार जनशक्ती पक्ष शेवगाव


सर्वच साखर सम्राटांचे साटेलोटे

शेवगाव- नेवासा - पाथर्डी पाथर्डी तालुक्यातील साखर कारखानादारांचा विचार केला तर राजकीय एकमेकांचे विरोधक दिसतात. कारखाना निवडणूक असो की कारखाना प्रशासनासंदर्भात कुठलाही प्रश्न असो. तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी अवस्था पहावयास मिळते. यामधून सर्वच साखर सम्राटांचे साटेलोटे असल्याचे मानले जात आहे.जवळजवळ सर्वच कारखान्याचे उसतोडणी कामगार शेतकऱ्यांना वेठीस धरुन पैशाची मागणी करत आहे. याबाबत कुठलाच कारखाना ठोस भूमिका घेतांना दिसत नाही. जर साखर कारखाना प्रशासनाने वेळीच आळा न घातल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शेतकरी साखर सम्राटांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. हे मात्र नक्की. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...